भराडी येथे अत्याधुनिक पूल, जोड रस्त्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

Foto
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश

सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ अत्याधुनिक पूल उभारण्यासह पुलाच्या दोन्ही बाजूंना जोडरस्ते करण्यासाठी शासनाने खास बाब म्हणून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, भराडीसह परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पूल उभारण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून अनेक
दिवसांपासून केली जात होती. कन्नड सिल्लोड महामार्गावरून भराडी गावात जाणारा हा रस्ता पुढे वडोद चाथा मार्गे अंभई व इतर गावांना जोडला जातो. त्यामुळे या मार्गावरून परिसरातील नागरिकांची नियमित वर्दळ असते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील अरुंद मार्ग आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

पावसाळ्यात या परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पुलावरून पाणी वाहू लागायचे. परिणामी, वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः आठवडी बाजाराच्या दिवशी आणि पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याचा प्रश्न गंभीर बनत होता. त्यामुळे या ठिकाणी अत्याधुनिक पूल उभारण्यासह दोन्ही बाजूंना जोडरस्ते करण्याची मागणी जोर धरत होती. 

या समस्येची गांभीर्याने दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, वाहतूक सुरळीत व्हावी आणि भराडीसह परिसरातील गावांना सुरक्षित दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून यासाठी निधीची मागणी केली होती. 

अखेर आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने या कामासाठी खास बाब म्हणून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे भराडी येथील पूल आणि जोडरस्त्यांच्या कामाला गती मिळणार असून, परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.